Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हयात एकही कुटुंब शौचालयाविना राहु नये याची दक्षता घ्या


जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची आढावा सभा
वाशिम, 4 मार्च - जिल्हयात एकही कुटुंब शौचालयाविना राहु नये याची दक्षता या विभागात काम करणार्‍या प्रत्येकांनी घ्यावी असे निर्देश जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाअंतर्गत विविध विषयाचा आढावा जि. प. अध्यक्ष ठाकरे यांनी जिल्हा परिषदेत दि. 3 रोजी घेतला. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे व सहाय्यक प्रशासन अधिकारी एच. जे. परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 जिल्हयातील एकाही गावामध्ये विना शौचालयाचे कुटुंब राहुनये यासाठी जिल्हा  परिषदे मार्फत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी बेस लाईन सर्वे मधुन सुटलेल्या कुटुंबाचा समावेश एल.ओ.बी. मध्ये करण्यात आला होता.
  त्यामधुन सुटलेल्या लाभार्थ्यांचा समावेश एन.ओ.एल.बी.(नो वन लेफ्ट बिहाईंड) यामध्ये करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. जिल्हयातील 6622 लाभार्थीचे आधारकार्ड एनओएलबी मध्ये ऑनलाईन करण्यात आले. मात्र यामध्ये नावे समाविष्ट करण्याची ऑन लाईन लिंक 31 जानेवारी रोजी बंद झाली असल्याने अनेक पात्र लाभार्थी लाभापासुन वंचित राहीले असल्याचे चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले. 
 आता खर्‍या अर्थाने संपुर्ण जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालय नसलल्या कुटुंबाची माहिती तालुका स्तरावर संकलीत करण्याचे निर्देशही जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले. त्यानतर ते ऑनलाईन करण्याबाबत आपण शासनाला पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विभागावार आपले बारीक लक्ष असुन भविष्यात नाविन्यपुर्ण काम करुन या विभागाची राज्यात चांगली ओळख निर्माण करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
 यापुर्वी ज्यांनी शासनाकडुन रु.500 ते 3200 पर्यंत शौचालय प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेतला आणि सध्या ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा कुटुंबांची माहिती ग्रामसेवकांमार्फत पंचायत समितीला सादर करण्याबाबत स्वच्छभारत मिशनच्या वतीने यापूर्वीच कळविण्यात आले होते.मात्र अद्यापही माहिती  प्राप्त झाली नसल्याबाबत जि.प. अध्यक्ष ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती शासनाला तात्काळ पाठवणे आवश्यक असुन ज्या ग्रामपंचायती ही माहिती दोन दिवसात सादर करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.
 दरम्यान बेस लाईन सर्वे 2012 मधील मागील सुमारे दीड वर्षापासुन लाभ देणे बाकी असलेल्या 600 पात्र लाभार्थ्यांना आठ दिवसात प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्याचे निर्देश जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.
 बेस लाईन मधुन सुटलेल्या पात्र लाभार्थींचे अनुदान तालुका स्तरावरुन वितरीत करण्याचे निर्देश यापुर्वीच देण्यात आले आहेत. तसेच यापुढे शौचालयाचा निधी तालुकास्तरावरुन वितरीत करण्यात येणार असुन याचा निधी तालुक्याला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी यावेळी दिली.