Ticker

6/recent/ticker-posts

आधार प्रमाणीकरणासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सेवेबरोबर माणुसकीचा प्रत्यय


वाशिम, 4 मार्च - राज्य शासनच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकासह जिल्ह्यातील 83 हजार 634 शेतकर्‍यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीमध्ये नाव असलेल्या शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, बँकेच्या माध्यमातून सुरु आहे. आधार प्रमाणीकरणासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि बँकेच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना बँक, आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून सेवेबरोबरच माणुसकीचा अनुभव येत आहे.
 मानोरा तालुक्यातील धावंडा येथील 70 वर्षीय शेतकरी श्रीमती पन्नीबाई आडे या आधार प्रमाणीकरणासाठी ऑटोरिक्षाने मानोरा येथील आपले सरकार सेवा केंद्रापर्यंत पोहोचल्या. मात्र त्यांना ऑटोरिक्षातून खाली उतरण्याचा, आपले सरकार सेवा केंद्राच्या पायर्‍या चढण्याचा व उतरण्याचा त्रास होऊ नये, यासाठी केंद्रचालक जगदीश पातुरकर यांनी आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक यंत्रणा ऑटोरिक्षापर्यंत नेवून सदर महिला शेतकर्‍याचे आधार प्रमाणीकरण करून घेतले. त्यामुळे संबंधित वृद्ध महिलेने व तिच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
 कारंजा तालुक्यातील बाबापूर येथील एका महिला शेतकर्‍याच्या कुटुंबालाही असाच माणुसकीचा प्रत्यय आला. आजारपणामुळे संबंधित महिला शेतकर्‍याला आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्रात येणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालक महादेव लवाटे यांनी सर्व आवश्यक सामग्रीसह संबंधित महिलेच्या घरी जावून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे या महिला शेतकर्‍यांने व त्यांच्या कुटुंबीयांनी आपले सरकार सेवा केंद्र चालक व प्रशासनाचे आभार मानले, असे आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी यांनी सांगितले.