Ticker

6/recent/ticker-posts

हयातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला सादर न केल्यास सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ होणार बंद

हयातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला सादर न केल्यास सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ होणार बंद
वाशिम, दि. ११ : सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील घटकांसाठी राबविण्यात येणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांनी २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार ३१ मार्च २०२० पूर्वी हयात प्रमाणपत्र सादर करणे तसेच एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
त्यानुसार सर्व योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या व्यवस्थापकाकडे अथवा पोस्टमास्तरकडे स्वतः हजर राहून आपले हयातीची नोंद करून घ्यावी. तसेच काही कारणांमुळे लाभार्थी बँकेत हजर राहू न शकल्यास, अशा लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालयातील संगायो शाखेमध्ये ३१ मार्च २०२० पूर्वी सादर करावे. ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा लाभार्थ्यांना १ एप्रिल २०२० पासून अर्थसहाय्य योजनेचा लाभ बंद करण्यात येईल. तसेच एप्रिल ते जून २०२० या कालावधीत उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातील संगायो शाखेत सादर करणे आवश्यक असून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे जुलै २०२० पासून अर्थसहाय्य बंद करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.