लाभार्थ्यांनी ‘गोल्डन कार्ड’ प्राप्त करून घेण्याचे आवाहन
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
वाशिम :27 फेब्रु.- आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून वाशिम जिल्ह्यातील 1 लक्ष 35 हजार 553 कुटुंबातील 4 लक्ष 15 हजार 175 लाभार्थ्यांना निवडक, गंभीर 1300 आजारांवर 5 लक्ष रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी व गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, देवळे हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल, बाहेती हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल व डॉ. वोरा हॉस्पिटल येथील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी. आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर येथून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती 30 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अंगीकृत रुग्णालयामध्ये याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 30 हजार लाभार्थींना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी 12 हजार 968 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र 4 लक्ष 15 हजार 175 लाभार्थींना गोल्डन कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गोल्डन कार्ड नसल्याने उपचारापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तरी पात्र असणार्या कुटुंबांनी तातडीने या योजनेत नोंदणी करण्यासाठी आपल्या परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी केले आहे.