Ticker

6/recent/ticker-posts

लावणी प्रकारात समतासंदेश कलासंचाचा प्रथम क्रमांक


लावणी प्रकारात समतासंदेश कलासंचाचा प्रथम क्रमांक


वाशिम :26 फेब्रु.- युवा व खेल मंत्रालय भारत सरकारव्दारे संचालीत नेहरु युवा केंद्र वाशीम व राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने स्थानिक लोकमान्य टिळक स्मारकमध्ये 24 फेब्रुवारी रोजी आयोजीत जिल्हास्तरीय लोककला उत्सवात उत्कृष्ट लावणीप्रकार सादर केल्याबद्दल उमरा शम. येथील समतासंदेश सांस्कृतीक कलापथकाला प्रथम क्रमांक देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या कलापथकाला यावेळी सन्मानित करण्यात आले.
 या जिल्हास्तरीय लोककला उत्सवात विविध कलापथक मंंडळासह कलावंतांनी सहभागी होऊन लोककला, भारूड, गोंधळ, नाटक, लावणी आदी विषयावर कला संच व वैयक्तीक एकल कला सादर केली. 
 यामध्ये उमरा शमशोद्दीन येथील समतासंदेश सांस्कृतीक कलापथकातील कलावंतांनी लावणी प्रकारात बहारदार नृत्य सादर करुन उपस्थितांची तसेच परिक्षकांची मने जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, अध्यक्ष नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यम मेश्राम, विशेष अतिथी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते निलेश सोमाणी, जिल्हा युवापुरस्कारप्राप्त भगवान ढोले, भिमराव पट्टेबहादुर, राजरत्न संस्था अध्यक्ष विनोद पट्टेबहादुर, परिक्षक सिने कलावंत अरविंद उचित, सिने अभिनेत्री हंसिनी उचित, अनिसचे पी.एस. खंदारे आदींच्या हस्ते समतासंदेश कलापथकाच्या कलावंतांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. लावणी प्रकाराबद्दल बोलतांना समतासंदेश कलापथकाचे शाहीर संतोष खडसे म्हणाले की, ढोलकीचा ताल...घुंगरांचे बोल आणि सौंदर्याची नजाकत म्हणजे लावणी. लावणी हा महाराष्ट्रातील लोकनृत्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे. आजही महाराष्ट्रामध्ये लावणी लोककलांमध्ये आपला दर्जा राखून आहे. 
 लावणीची जादू मराठी प्रेक्षकांवर इतकी आहे की, मराठी चित्रपटसृष्टी आणि अगदी बॉलीवूडलाही लावणीची भूरळ पडली आहे. अशी ही लावणी लोककला  यासह विविध लोककलेचा वारसा महाराष्ट्रात जिवंत ठेवण्यासाठी समतासंदेश कलापथक मंडळ सातत्याने प्रयत्न करत आहे. 
 या लावणी सादरीकरणात नृत्यसम्राट अमोल वानखडे, गुलब्याच्या भूमिकेत साहेबराव पडघान, पाटलाच्या भूमिकेत शेषराव मेश्राम, ढोलकीवादक सुनिल सावळे, हार्मोनियम वादक सुरेश श्रृंगारे, साथसंगत प्रकाश खडसे, विनोदी कलावंत गजानन खडसे आदी कलावंतंानी सहभाग घेतला.