Ticker

6/recent/ticker-posts

करोनाच्या अफवेची कुर्‍हाड जिल्हयातील पोल्ट्री व्यवसायीकांवर


करोनाच्या अफवेची कुर्‍हाड जिल्हयातील पोल्ट्री व्यवसायीकांवर
एका कोंबडीमागे सत्तर रुपयाचे नुकसान
पंचनामा करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी
व्यवसायीकांचे प्रशासनाला निवेदन
वाशीम - एकीकडे भारतात करोना या आजाराने थैमान घातले असतांना दुसरीकडे सोशल मिडीयावरुन कोेंबड्यांमुळे हा आजार होत असल्याच्या अफवेमुळे बॉयलर कोंबड्यांना कवडीमोल भाव आला आहे. त्यामुळे चिकन खरेदीसाठी ग्राहक फिरकेनासा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बॉयलर पोल्ट्री व्यवसायीकांचे प्रचंड नुकसान होत असून ते हवालदील झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हयातील पोल्ट्री व्यवसायीकांनी 9 मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून फॉर्ममधील पक्षी पंचनामा करुन प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
    निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार  व शेतकरी वर्ग उपजिविकेकरीता पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. मात्र चिकनमुळे करोना आजार होत असल्याच्या अफवेमुळे कोंबड्या विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. या व्यवसायाकरीता अनेकांनी बँक कर्ज, मालमत्ता गहाण, सोसायटी कर्ज, बचतगट आदींमधुन पैसे उभारुन हा व्यवसाय उभारला आहे. मात्र काही समाजकंटकांनी पसरवलेल्या अफवेमुळे ग्राहकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली आहे. याबाबत प्रशासनासह पशुसंवर्धन विभागाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे की, चिकन खाण्यामुळे कोरोना होत नाही. मात्र, ग्राहक चिकन खरेदी करत नसल्यामुळे या पोल्ट्री व्यवसायीकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये प्रती कोंबडी 81 रुपये खर्च येत आहे. परंतु याच कोंबडीचे बाजारात विक्री मुल्य 10 रुपयावर आले आहे. त्यामुळे प्रती कोंबडी 70 रुपये प्रमाणे नुकसान सोसावे लागत आहे. आज या पोल्ट्री व्यवसायीकांकडे पाच ते सहा दिवसापुरतेच खाद्य असून हे खाद्य संपल्यावर सर्व व्यवसायीक आपल्या कोंबड्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून सोडतील. पोल्ट्री व्यवसायीकांच्या या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून बॉयलर पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या व्यवसायीकांनी केली आहे.
    जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर रमेश जाधव, शे. शायद शे. फतरु, शे. अमजद, शे. इसाक शे. रज्जाक, शे. वायेद शे. फतरु, नामदेव सानप, कैलास पुरी, विष्णू घुगे, अल्ताफखान गुलाबखान, डॉ. शेख तसलीम, परमानंद मुटकुळे, गजानन गावंडे, शेख मंजुर शेख सत्तार, सुधीर पटवर्धन, शेख इलीयास शेख मक्सुद, विनोद पखाले, अमोल पखाले आदी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायीक व शेतकरी वर्गाच्या सह्या आहेत.