जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम :27 फेब्रु.- जिल्ह्यात दि. 18 फेब्रुवारी 2020 पासून उच्च माध्यमिक परीक्षेस सुरुवात झाली आहे. 1 मार्च 2020 पासून माध्यमिक शालांत परीक्षेस सुरुवात होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी 22 फेब्रुवारी ते 7 मार्च 2020 दरम्यान वाशिमचे जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू केला आहे.
या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, सामाजिक सण, लग्न सोहळे, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे, रंगमंच, विभिन्न भागामध्ये निश्चित दिवस ठरवून दिलेले आठवडी बाजार आदी ठिकाणी हा आदेश लागू राहणार नाही.
उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकार्यांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तसेच आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी/दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.