Ticker

6/recent/ticker-posts

शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक - उमेश बन्सोड

शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक - उमेश बन्सोड
जिजाऊमाता बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात
वाशीम - छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अधिपत्याखालील प्रदेशात उत्तम पद्धतीची शासन व्यवस्था व शांतता निर्माण केली. शेतकरी वर्गासाठी हितावह धोरणे आखली. कोणत्याही महिलेचा अनादर होणार नाही, याची छत्रपती शिवरायांची दक्षता घेतली. शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली असल्याचे प्रतिपादन उमेश बन्सोड यांनी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना केले.
  स्थानिक ढवळेवाडी येथील जिजाऊ बहूउद्देशिय संस्थेच्या कार्यालयात बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सविता कांबळे ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उमेश बन्सोड, देवानंद खंडारे, विनोद ढवळे, प्रकाश खोडके, दिपक मोठे, बेबीताई पडघान यांची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन शिवरायांच्या कार्याचे वर्णन केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना उमेश बन्सोड म्हणाले की, शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, ही शिवरायांची आज्ञा आजही एका आदर्श प्रशासकाचे वचन म्हणून सुवर्णाक्षरांत कोरली गेली आहे. ‘रयत सुखी, तर राजा सुखी’ ही नीती स्वीकारून त्यांनी शेती व्यवसायात व महसूल व्यवस्थेत अनेक सुधारणा घडविल्या. त्यांच्या उदार, सहिष्णू व लोककल्याणकारी धोरणांमुळे त्यांनी सामान्य रयतेच्या, शेतकर्‍यांच्या, लढवय्या सैनिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. आपल्या या कार्यामुळे खर्‍या अर्थाने छत्रपती असलेले शिवाजी महाराज हे आज लाखो लोकांच्या विचारांची प्रेरणा बनले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. पोर्णिमा बन्सोड यांनी तर आभार प्रिती कांबळे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश कांबळे, कल्पना कांबळे, गोलु कांबळे, धम्मशिला ढवळे, कल्पना मोठे, सुनिता कांबळे, माधव ढवळे आदींसह संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील पुरुष व महिलांची बहूसंख्येने उपस्थिती होती.