कायदेशीररित्या अर्हताधारक डॉक्टर्सवर बोगस म्हणून शासनाकडून कार्यवाही न करण्याची मागणी
अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
वाशीम - अल्टरनेटीव्ह मेडीसीन, नॅचरोपॅथी मेडीसीन, कम्युनीटी मेडीकल सर्व्हीस अॅन्ड इसेंशियल ड्रग, इलेक्ट्रो होमिओपॅथी पात्रता धारक डॉक्टर्सवर बोगस म्हणून शासनाकडून कार्यवाही न करण्याची मागणी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली असूून यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या पुढाकारात 13 फेब्रुवारी रोजी आरोग्यमंत्री ना. अमित देशमुख यांना निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की, अल्टरनेटीव्ह मेडीसीन, नॅचरोपॅथी मेडीसीन, कम्युनीटी मेडीकल सर्व्हीस अॅन्ड इसेंशियल ड्रग, इलेक्ट्रो होमिओपॅथी अर्हताधारक डॉक्टर्सवर शासनाकडून बोगस म्हणून कार्यवाही करण्यात येत आहे. ही बाब चुकीची असून महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भागात अतिआवश्यक असलेली रुग्णसेवा हे सहयोगी डॉक्टर्स देत आहेत. पण काही तथाकथित लोक या डॉक्टरांना ब्लँकमेल करुन पैशाची मागणी करतात तर काही नेते मंडळी राजकीय व्देषापोटी प्रशासनाला निवेदन देवून व प्रशासनावर राजकीय दबाव आणून डॉक्टर्सवर कार्यवाही करण्यास भाग पाडतात. परंतु हे डॉक्टर्स कायदेशीररित्या उच्च न्यायालय व शासनाच्या विविध आदेश व निर्णयाचे यथोचित पालन करुन आपला व्यवसाय करु शकतात. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वेळोवेळी विविध आदेश व परिपत्रक पारित केले आहेत. त्यानुसार हे सर्व अर्हताधारक डॉक्टर्स कायदेशीरित्या आपला वैद्यकिय सेवा देवु शकतात.
तरी आरोग्य खात्याचे मंत्री या नात्याने कायदेशीररित्या अर्हताधारक डॉक्टर्सवर अन्याय होणार नाही याबाबत सर्व संबंधीतांना सुचना व निर्देश द्यावेत अशी मागणीही दिलेल्या निवेदनादारे डॉ. हिवाळे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत आरोग्य सचिवांना सुध्दा देण्यात आली आहे.