क्रीडा सवलतीच्या वाढीव गुणांसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
वाशिम :14 फेब्रु.- इयत्ता दहावी, बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व शालेय जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होवून प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबत 20 डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
त्यानुसार सन 2019-20 या शालेय वर्षापासून सुधारित नियमावलीनुसार क्रीडा गुण सवलत देण्यात येणार आहे. याकरिता ऑनलाईन प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावाची हार्ड कॉपी दोन प्रतीत प्राचार्य अथवा मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह तसेच प्रमाणपत्र साक्षांकित करून शारीरिक शिक्षक यांच्यामार्फत 31 मार्च 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी केले आहे.
विहित मुदतीनंतर कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात मान्यताप्राप्त विविध खेळ संघटनांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रविण्यप्राप्त अथवा सहभागी झालेल्या खेळाडूंनी विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे 31 मार्च पर्यंत सादर करावेत.
अधिक माहितीसाठी 20 डिसेंबर रोजीचा शासन निर्णय व शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे. याबाबत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत यादीसह प्राप्त झाल्यानंतरच प्रस्ताव स्वीकारले जातील, असे श्री. पांडे यांनी कळविले आहे.