Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम येथे गुगल नवलेखा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात


वाशिम येथे गुगल नवलेखा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात


पहाटवारा न्युज नेटवर्क
वाशिम - नवलेखक आणि लघु प्रकाशकांना गुगलने मोफत सुरु केलेल्या नवलेखा या उपक्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने शनिवार, 29 फेब्रुवारी रोजी स्थानिक अकोला नाका येथील अल्टरनेटीव्ह मेडीसीन असोसिएशनच्या कार्यालयात आयोजीत गुगल नवलेखा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. 
 कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधव हिवाळे हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवलेखाचे महाराष्ट्र क्षेत्रीय जनसंपर्क अधिकारी रमेश माळी पुणे यांची उपस्थिती होती. यावेळी माळी यांनी उपस्थित नवलेखक आणि प्रकाशकांना गुगलने सुरु केलेल्या नवलेखा या नव्या उपक्रमाची माहिती संगणकावर प्रात्यक्षीकासह दिली.
  ते म्हणाले की, सध्याचे युग हे डीजीटल असल्यामुळे सर्वच जण आपली उत्पादने, प्रकाशने हे जास्तीत जास्त परिणामकारकपणे कशी लोकांसमोर पोहचतील यासाठी डीजीटल साधनांचा उपयोग करत आहेत. मोठया प्रकाशकांच्या कार्याचा विस्तार फार मोठा असल्याने साहजीकच त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होत असते. 
 मात्र शहरी तथा ग्रामीण भागातील लहान प्रकाशक तथा नवलेखक यांच्या उत्पन्नाचे साधन फार कमी असते. याचे कारण त्यांची संसाधने हे जनतेपर्यत चांगल्या पध्दतीने पोहचत नाहीत. ही बाब हेरुन गुगल कंपनीने नवलेखा हा तीन वर्षे पुर्णपणे मोफत असलेला हा उपक्रम सुरु केला आहे. 
 या उपक्रमाची कास धरुन नवलेखक तथा लघु प्रकाशक डिजीटलच्या साथीने जास्तीत जास्त लोकांपर्यत माहिती पोहचवू शकतात. तसेच त्यांच्या कामाचा आवाका पाहून गुगलकडूनही त्यांना आर्थिक हातभार देण्याची तजवीज करण्यात आली आहे. 
 त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशकांनी या मोफत असलेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही माळी यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला गजानन धामणे, गजानन बानोरे, संदीप पिंपळकर, प्रकाश लहाने, सुधाकर चौधरी, बाबाराव कोडापे, काशीनाथ कोकाटे आदींची उपस्थिती लाभली.