मतदारांची सद्सद्विवेक बुध्दी
शहरी आणि ग्रामीण भागातील मतदार तसेच सुशिक्षीत आणि अशिक्षीत मतदार असे मतदारांचे दोन भाग दिसतात. सुशिक्षीत मतदारांना मतदानाचे महत्व व आचारसंहितेची जाणीव असू शकते. त्याचप्रमाणे अशिक्षीत मतदारामध्ये अशी जनजागृती निर्हेतूकपणे सुशिक्षातांनी केली पाहिजे. मतदान कोणत्याही निवडणूकीचे असो त्या निवडणूकीत मतदाराचे मत अमूल्य असते. निवडणूक मतदान प्रक्रीयेत त्याची महत्वाची भूमिका असते. म्हणून मतदारांनी सद्सद् विवेक बुध्दीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निर्भयपणे सज्ज असले पाहिजे. निवडणूकीत पूर्वी वापरात असलेल्या कागदी मतपत्रिका जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आधूनिक माहिती तंत्रज्ञानामुळे निवडणूक प्रक्रिया विकसीत झाली असून आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दोर मतदाराला मत नोंदवावे लागते. या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा अनुभव बर्याच मतदारांना असू शकतो. मात्र प्रथमच मतदान करणार्या तसेच ज्यांना या मतदान यंत्राचा अनुभव नाही त्यांनी अनुभवी, जागरुक मतदारांकडून माहिती घ्यावी. त्यामुळे मतदान करतांना नविन मतदाराचे मत व्यर्थ जाणार नाही. तसेच मतदारानी मतदानात गोपनियता पाळावी. निवडणूकीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता अमलात आणली आहे. या आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती मतदारांनी जाणून घ्यावी. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकवेळा निवडणूक लढविणार्या उमेदवारांकडून प्रलोभने दाखविली जातात.
कोणत्याही अभिलाषेपोटी मतदाराने प्रलोभनाला बळी पडू नये. आणि कोणाच्याही दडपणाखाली मतदान करु नये कारण त्याला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. दुसर्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान करण्यास कधीही प्रवृत्त होऊ नये. अशा अनूचित प्रकारांना मतदारांनी मनापासून विरोध करावा. वास्तविक पाहता लोकशाही प्रणालीमध्ये नागरिकांना मतदानाचा अधिकार राज्य घटनेने बहाल केल्यामुळे मतदार हाच लोकशाही खरा राजा असल्याची संकल्पना दृढ झाली आहे. व ती यथार्थ आहे.कारण हा मतदार निवडणूकीत मतदानाच्या माध्यमातून चारित्र्यवान व विविध सामाजिक घटकांच्या विकासासाठी दुरदृष्टी ठेऊन काम करणार्या उमेदवाराची निवड करुन राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकतो. आणि हीच जाणीव जागृती मतदारामध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.
निवडणुकीत माझ्या एका मतामुळे काय फरक पडतो? मी कशाला मतदान करु ? मतदान केल्यामुळे माझा काय फायदा ? असे प्रश्न निर्माण करुन मतदानाचं महत्व कमी करु नये. या उलट निवडणूकीत कोणता उमेदवार समाजाच्या व राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करणारा असू शकतो, त्याची पात्रता काय, सामाजिक कार्यातील त्याची धडपड व त्याच्या ठायी असलेल्या सदगुणांचा विचार मतदारांनी करणे अत्यंत महत्वाचे ठरते. मतदारांनी सद्सद् विवेकबुध्दीने केलेल्या प्रभावी मतदानामुळेच योग्य उमेदवार निवडल्या जातो. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य राज्यातील काही जिल्ह्यातील आदिवासीक्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनव्दारे मतदारात जनजागृती करण्यात येत आहे. म्हणूनच लोकशाही प्रणालीमध्ये मतदार हाच खरा राजा आहे. असे म्हणणे वावगे ठरु नये.